Tuesday, August 8, 2017

सांडग्याची सुकी भाजी | Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji

सांडग्याची सुकी भाजी | Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji 


नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन  मध्ये !!
सांडगे हा वाळवणाचा पदार्थ असा एक अत्यंत उपयोगी आहे कि जो फक्त तोंडीलावणं म्हणून न वापरता कधीही चटकदार अशी भाजी बनवली जाऊ शकते.उन्हाळयात करून ठेवलेले सांडग्यांची वर्षभरात कधीही भाजी भाजी बनवू शकता. जेव्हा कधीही फ्रिज मध्ये भाजी नसेल, आणि काही तरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली कि बरणीतून सांडगे काढून कधीही सांडग्याची भाजी करता येते. शिवाय भाजी निवडा, चिरा या भानगडी नसल्यामुळे कमीत कमी वेळेत होते. आवडीप्रमाणे सांडग्याची भाजी सुकी किंवा थोडी रस्सेदार बनवू शकतो. सांडग्याची झणझणीत भाजी, भाकरी जोडीला ताक .....खरंच अप्रतिम  !!!

सांडग्याच्या भाजी चे साहित्य- Ingredients For Sandgyachi Bhaji

२ वाट्या सांडगे,
२ मोट्ठे कांदे(बारीक चिरून ),
१ टोमॅटो(बारीक चिरून ),
२-३ tsp खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट,
घरगुती काळा मसाला(कांदा लसूण मसाला)
फोडणीसाठी जिरे, मोहरी कढीपत्ता(ऐच्छिक)

 

कृती- How to make Sandgyachi Bhaji

१.कढईत १ tsp तेल गरम करून त्यात सांडगे भाजून घ्यावेत. सांडगे भाजताना सुरवातीला गॅस माध्यम आचेवर असावा व नंतर तो मंद आचेवर करावा. म्हणजे सांडगे खरपूस भाजले जातील.
सांडग्यांचा रंग बदलून तो सोनेरी झाला व ते छान आतपर्यंत भाजले गेले कि कढईतून काढावेत.
२. त्याच कढईत थोडेसे तेल घालावे. सांडगे तेलात भाजले असल्यामुळे त्याला असलेले तेल लक्षात घेऊन बेताचेच कांदा परतेल इतपत तेल घालावे. तेलाला जिरे , मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यावी.
३. आता यात चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा.
४. यात छोटा चमचा हळद घालावी. चिरलेला टोमॅटॊ घालून परतून घ्यावे. आवडीनुसार १ ते २ चमचे कांदा-लसूण मसाला/ काळा मसाला यात घालावा. सर्व व्यवस्थित परतून घ्यावे. काळा मसाला नसल्यास लाल तिखट घातले तरी चालेल.

५. भाजलेले सांडगे घळलावेत. सर्व एकदा परतून यात गरजेनुसार कोमट पाणी घालावे. चवीपुरते(सांडग्याचे मीठ लक्षात घेऊन ) मीठ घालावे.
६. सांडगे ५ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावेत. सांडग्याचे शिजणे हे सांडग्यांचा आकार, पिठाचा रवाळपणा व ते किती खरपूस भाजले आहेत यावर ठरते. जर सांडगे मोट्ठे असतील तर शिजायला वेळ लागतो.
७. एखादा सांडगा घेऊन तो बोटाने आतपर्यंत शिजला आहे का ते पाहावे. सांडगा खूप जास्त देखील मऊ शिजवू नये. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालावा. सर्व व्यवस्थित मिक्स करून शेवटी गॅस बंद करावा.

संपूर्ण कृतीचा Video: Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji 


Monday, April 17, 2017

कैरीची कांदा घालून चटणी  | Kairi Chutney | Raw Mango-Onion Chutney

 

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कैरीची कांदा घालून बनवलेली चटणी.
उन्हाळ्याच्या सुरवातीपासून बाजारात कैरी उपलब्ध होऊ लागली कि कैरीचे विविध पदार्थ बनवले जातात. थंडगार पन्ह्या पासून ते कैरीची डाळ, चटकदार लोणची, विविध चटण्यां पर्यंत रोज कैरीचे पदार्थ बनवले जातात.त्यांपैकीच एक माझी  आवडती कैरीची रेसिपी म्हणजे कांदा घालून केलेली कैरीची चटणी. आंबट-गोड आणि तिखट अशी हि चटणी तुम्ही देखील नक्की करून बघा.



साहित्य :                               

१ कैरी
१ मोठ्ठा कांदा
५-६ सोललेल्या लसणाच्या पाकळ्या 
थोडासा गूळ
जिरे-मोहरी,
हिंग ,
कढीपत्ता,
लाल तिखट,
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट.
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१. कैरीची साल काढून बारीक तुकडे करावेत. कैरी खुप आंबट असेल तर कमी प्रमाणात वापरावी.
२.  कांदा बारीक चिरून घ्यावा.
३. मिक्सर च्या छोट्या भांड्यात प्रथम १ छोटा चमचा जिरे,५-६ लसणाच्या पाकळ्या,कैरीचे तुकडे,
 आणि चवीपुरते मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. वाटताना पाणी वापरू नये.
४.यात बारीक चिरलेला कांदा, कैरीच्या आंबटपणानुसार १ चमचा बारीक केलेला गूळ घालावा. आवडीनुसार १ चमचा लाल तिखट यात घालावे. रंग छान येण्यासाठी १/२ चमचा काश्मिरी लाल तिखट यात घालू शकता.
५. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात थोडेसे मिक्स करून पुन्हा एकदा पाणी न घालता वाटून घ्या.


६.बाउल मध्ये हि चटणी काढून यात १ चमचा शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करावे.
७. थोडेसे तेल गरम करून जिरे-मोहरी-हिंग-कढीपत्त्याची कडकडीत फोडणी चटणीला द्यावी.
तयार आहे चटपटीत अशी कैरीची चटणी. या चटणीत कच्चा कांदा वापरला असल्यामुळे ती ताजीच करून दिवसभरात संपवावी.
संपूर्ण कृतीचा video : 


 



Tuesday, March 7, 2017

कढीपत्त्याची चटणी 

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!
आज एक वेगळ्या प्रकारची चटणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
ती म्हणजे कढीपत्त्याची चटणी. रोजच्या फोडणीत असणारा कढीपत्ता, भाजी किंवा पोहे खाताना शक्यतो बाजूला काढून टाकला जातो मग त्याची चटणी कशी लागेल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.पण कढीपत्त्याची चटणी अतिशय स्वादिष्ट लागते. भाताबरोबर किंवा तोंडीलावणं म्हणून हि चटणी छान लागते.दह्यामध्ये कढीपत्त्याची चटणी घालून ती पोळी अथवा भाकरी सोबत खाऊ शकता.तसेच सुक्या भाज्यांना देखील हि चटणी वरून घालून तूच स्वाद वाढवू शकता. हि सुकी चटणी असून १५ दिवस चांगली राहते तसेच फ्रिज मध्ये ठेवल्यास अजून जास्त टिकते. कढीपत्ता आरोग्याच्या दृष्टितने विशेषतः केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. केस काळे राहावे आणि गळू नयेत म्हणून कढीपत्ता अतिशय गुणकारी आहे. चटणीच्या निमित्ताने कढीपत्ता खाण्यात येतो.

साहित्य:                              
भरपूरसा कढीपत्ता
तीळ
सुक खोबर
जिरे
लसूण
लाल तिखट


कृती:
१. प्रथम कढीपत्त्याची पानं काढून घ्यावीत. कढईत ३-४ चमचे तेल गरम करून त्यात हि पानं थोडी-थोडी करून तळून घ्यावीत. पानं चिवड्यासाठी तळतो तशी  कुरकुरीत तळली गेली पाहिजेत.
२. तव्यावर थोडेसे तेल गरम करून त्यावर हि कढीपत्त्याची पानं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजली तरी चालतील.फक्त याला खूप वेळ लागतो त्यामुळे याठिकाणी मी पानं तळून घेतली आहेत.
३. आता तळलेली पानं टिश्यू पेपर वर निथळून घ्यावीत.यावर १ छोटा चमचा हिंग टाका.

४.उरलेल्या तेलात सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत. तुम्हाला जर कढीपत्ता अजिबातच आवडत नसेल तर खोबऱ्याचे प्रमाण चटणीत जास्त ठेवा.
५.  ४-५  लसणाच्या कुड्या तळून घ्याव्यात.तसेच जिरे आणि तीळ देखील तळून घ्यावेत.जिरे आणि तीळ भाजून घेतले तरी चालतील.
६ आता मिक्सर च्या छोट्या भांड्यात प्रथम जिरे-खोबर-लसूण बारीक करून घ्यावे. नंतर यात तळलेली पानं, तिखट आणि मीठ  टाकून फक्त १-२ वेळा मिक्सर फिरवून पानं खूप बारीक न वाटता ओबडधोबड वाटून घ्यावीत. 

७. मिश्रण बाउल मध्ये काढून घ्या. यात तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे कढीपत्त्याची खमंग चटणी.
संपूर्ण कृतीचा video : 



Wednesday, March 1, 2017

थापट वडी

 

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
आज मी तुमच्याबरोबर शेअर  करणार थापट वडी ची रेसिपी. हि पारंपरिक वडी वेगवेगळ्या भागात वेगवेळ्या नावाने ओळखली जाते. मासवडी, पाटवडी अश्या विविध नावाने ती ओळखली जाते. हि बेसन ची वडी असून, ती हाताने थापून बनवतात त्यामुळे तिला थापट वडी म्हणतात. ह्या वड्या साईड डिश म्हणून छान लागतात, त्याचप्रमाणे जर याच्याबरोबर सार बनवले कि भाजी म्हणू देखील खाता येते.
साहित्य:
१ कप बेसनपीठ
फोडणीसाठी जिरे,मोहरी, हिंग,हळद
लसूण-हिरवी मिरची पेस्ट
खसखस
सुक्या खोबऱ्याचा कीस
बारीक चिरलेली कोथिंबीर

सार बनवण्यासाठी
बारीक चिरलेला कांदा
टोमॅटो
आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट

वडी बनवण्याची कृती :
१. कढईत एक मोठ्ठा चमचा तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे टाका.मोहरी तडतडली की हिंग आणि लसूण मिरची ची पेस्ट, शेवटी हळद टाका.
२.आता फोडणीत (१ कप बेसनसाठी) २ कप  पाणी टाका.
३.गॅस मोठ्ठा ठेवा.पाणी उकळायला लागल्यावर त्यात बेसनपीठ टाका.बेसनपीठ एकदम न टाकता थोडे थोडे टाकायचे आहे. तसेच ते सतत हलवावे  उकळत्या पाण्यात पीठ टाकल्यामुळे गुठळ्या कमी होतील.तसेच ते सतत हलवावे. बेसनपीठ पाण्यात कालवून देखील फोडणीत टाकू शकता,पण उकळत्या पाण्यात बेसन घातलेली वडी अधिक छान लागते..
४. गॅस बारीक करा. पीठ पळीने फेटत राहा. पाणी आटल्यावर झाकण घालून पीठ ५ मिनिटे शिजू द्या. ५ मिनिटानंतर झाकण काढून  पीठ  पुन्हा फेटून घ्या. परत २ मिनिटे झाकण घालून शिजू द्या.
६ अश्याप्रकारे पीठ घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. पीठ थोडे थंड होऊ द्या.पीठ कोमट असताना ताटलीला तेल लावून त्यावर वड्या थापून घ्या. वड्या हाताला पाणी लावून कोमट असताना थापाव्यात.पीठ जसे जसे थंड होईल तसे ते अधिक घट्ट होऊन वड्या पडतील.त्याचप्रमाणे त्या थोड्या जाडसर असाव्यात.
७. भाजलेली खसखस टाकून ती हाताने थोडा दाब देऊन वड्यांवर पेरा. शंकरपाळी च्या आकारात वड्या चाकूने कापा.बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस टाकून वड्या सर्व्ह करा. या वड्यानुसत्या देखील छान लागतात. याबरोबर सार अथवा आमटी केली कि भाजी म्हणून देखील खाता येते.

सार बनवण्याची कृती :

८. वड्या केल्यानंतर कढई ला जे बेसन पीठ चिकटले असेल त्यात पाणी घालून उकळून घ्या.
९. पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. यात आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट टाका.
१०. मसाल्याला तेल सुटू लागले कि यात हळद, मीठ आणि लाल तिखट टाका. यात उकळलेले बेसनाचे पाणी टाका. लागेल तेवढे पाणी यात घाला. उकळले कि सार वड्यांसोबत सर्व्ह करा.

संपूर्ण कृतीचा video :


Wednesday, February 22, 2017

कमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे | साबुदाणा टिक्की 



नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये !!
उपवास असो व नसो साबुदाणा वडे सगळ्यांनाच आवडतात.गरम-गरम कुरकुरीत साबुदाणा वडे, उपवासाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी उपवास असणं गरजेचं नाही. तेलकट असल्यामुळे बऱ्याचवेळा वड्याऐवजी खिचडी करतो. जर न तळता कमी तेलात वडे बनवायचे असतील तर ते आप्पेपात्रात बनवावेत. यामुळे कमी तेलात तितकेच स्वादिष्ट साबुदाणा वडे बनतात.
यासाठी लागणार साहित्य आहे
१ मोठी वाटी भिजवलेला साबुदाणा
१/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
२ उकडलेले बटाटे
१ चमचा मिरची-जिरे पेस्ट
कोथिंबीर
लिंबू
कृती.
१. साबुदाणा आदल्या रात्री भिजवून  घ्यावा. यासाठी प्रथम साबुदाणा धुवून,निथळून घ्यावा. मग त्यात साबुदाणा हलकासा भिजेल इतपत म्हणजे साबुदाण्याच्या लेवल पर्यत पाणी ठेवून, झाकण ठेवून तो रात्रभर(३-४ तास )भिजू द्यावा. भिजल्यानंतर साबुदाणा छान फुलून कोरडा झाला पाहिजे.
२. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करावा. खिचडी साठी अथवा वड्यांसाठी शेंगदाणे भाजताना प्रथम ते माध्यम आचेवर थोड्यावेळ भाजावेत, नंतर मंद आचेवर छान खरपूस वास सुटेपर्यंत भाजावेत. मंद आचेवर भाजल्यामुळे शेंगदाणे आतपर्यंत, छान भाजले जातात. नंतर ते पूर्ण थंड होऊ द्यावेत आणि मग त्याचा जाडसर कूट करावा.

३ भिजवलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट घाला व व्यवस्थित मिक्स करा. सगळ्या साबुदाण्याला व्यवस्थित कूट लागेल इतपत कूट घालावा. साधारण १/२ वाटी कूट, १ वाटी साबुदाण्याला लागेल. साबुदाणा शिजला कि चिकट  होतो, त्यामुळे कूटाने चिकटपणा कमी होतो म्हणून वड्यांसाठी थोडा जास्त कूट घालावा.
४. आता यात उकडलेला बटाटा कुस्करून घाला.पाणी न घालता साबुदाणा वड्याचे पीठ मळता येईल इतपत बटाटा लागेल.
५. यात चवीपुरते मीठ, जिरे-मिरची ची पेस्ट आणि बारीक चिरलेली  कोथिंबीर टाका. १ चमचा लिंबाचा रस घाला.
६.सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्या.
७.आता हाताला तेल लावून पिठाचे आप्पेपात्रात बसतील अश्या आकाराचे गोळे करा.दोन्ही हातांनी गोळ्यांना मधोमध दाब द्या. सर्व पिठाचे गोळे बनवून घ्या.

८. आप्पेपात्र माध्यम आचेवर पूर्णपणे गरम करून घ्या. चमच्याने यात तेल सोडा. याठिकाणी तेलाऐवजी तूप देखील वापरता येईल. पहिल्या घाण्याला थोडे जास्त तेल लागेल नंतर तेल कमी-कमी लागत जाईल. शेवटी-शेवटी तेल न घालता देखील छान वडे बनतील. त्याचप्रमाणे नॉनस्टिक चे आप्पेपात्र असेल तरीदेखील कमी तेल लागेल. आप्प्याचं साचा मोठ्ठा असेल तर छान मोठ्ठे वडे करता येतील.
९. यात वडे अलगद सोडा. झाकण घालून ७-८ मिनिटे शिजू द्या. वडे छान खरपूस रंगाचे झाले कि आपपत्रापासून आपोआप सुटतील. चिकटले असतील तर थोडे अजून शेकू द्या नंतर चमच्याने हलके सोडवून घ्या.

१०. दुसऱ्या बाजूनेदेखील वडे शेकून घ्या. शक्यतो घालावे तेल लागणार नाही.
११. वड्यासोबत खाण्यासाठी झटपट चटणी बनवायची असल्यास दही, शेंगदाण्याचा कूट, जिरे, मीठ आणि लाल तिखट मिक्सरमध्ये फिरवून चटणी करू शकता.
१२. गरम-गरम वडे चटणीबरोबर सर्व्ह करा.
संपूर्ण कृतीचा video :   


Wednesday, February 15, 2017


 थालीपीठ


नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
   आजची रेसिपी आहे थालीपीठ . सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्री च्या जेवणाला एखादी हेल्थी वन पॉट डिश बनवायची असेल तर तर थालीपीठ उत्तम आहेत. यासाठी ठराविक साहित्य असे काही नसून, थालीपीठाचे पीठ बनवले कि यात जे किचन मध्ये उपलब्ध आहे ते साहित्य टाकू शकतो.
यासाठी लागणारे बेसिक साहित्य आहे:
२ वाटी ज्वारीचे पीठ
पाव वाटी गव्हाचेपीठ
पाव वाटी बेसनपीठ
पाव वाटी भिजवलेले पोहे
प्रथम तिन्ही पीठ मिक्स करून घ्या. यात भिजवलेले पोहे टाका. पोहे टाकल्याने थालीपीठ खुसखुशीत होतात.

आता पिठात १ चमचा हळद आणि  २-३ चमचे तीळ टाका. थालीपीठात तीळ खूप छान लागतात.
मिक्सरच्या छोट्या भांड्यात ५-६ लसणाच्या पाकळ्या ,
३-४ हिरव्या मिरचीचे तुकडे,
१ चमचा जिरे
१ चमचा धणे
अर्धा चमचा ओवा
आणि मीठ टाका.
सर्व साहित्य पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे आहे.
हे वाटण पिठात टाका.
आता यात एक मोठा कांदा आणि भरपूरशी कोथिंबीर बारीक चिरून टाका.
कांदा घातल्याने थालीपीठ पिठूळ लागत नाही व त्यात ओलसरपणा पण राहतो.
कोथिंबिरीमुळे  खमंग वास थालीपीठाला येतो.

   फक्त एवढे साहित्य वापरून जरी थालीपीठ केले तरी ते खूप छान आणि खमंग होते.
जर फ्रिज मध्ये एखादी पालेभाजी असेल, तर ती बारीक चिरून यात टाकता येते तसेच दुधी, असेल तर तो साल काढून किसून यात वापरता येतो.
शिवाय जर उरलेले भात किंवा भाजी असेल तर ती देखी यात घालू शकता.
भात टाकल्याने तर थालीपीठ खूप छान खुसखुशीत होतात. भाजीमुळे याला प्रत्येकवेळी वेगळी 
चव लागते. पिठलं उरल असेल तर ते यात घालू शकता. अतिशय चविष्ट थालीपीठ होतात. घट्ट डाळ किंवा आमटी उरली असेल तर ती पण यात टाकता येते.
शिवाय थालीपीठ त   ओवा टाकल्यामुळे  हे सर्व पचनाला जड नाही होत.

लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवा. हे पीठ खूप घट्ट अथवा खूप सैलसर नसावे. थालीपीठ थापताना पाणी वापरणार आहोत, हे लक्ष्यात घेऊन त्याप्रमाणे पीठ भिजवावे.

वेगवेगळ्या पद्धतीने थालीपीठ थापता येते.
तव्यात पेटंटचा गोळा ठेवून तो थापून थालीपीठ बनवता  येते. या पद्धतीने बनवलेले थालीपीठ थोडे जाडसर असते. त्याचप्रमाणे हाताला ताव पोळू नये यासाठी काळजी घ्यावी लागते.
दुसऱ्या पद्धतीत प्लास्टिक च्या पेपर ला अथवा अल्युमिनियम फॉईल ला तेल लावून थालीपीठ थापता येते.पण बऱ्याच वेळा थालीपीठ तव्यावर टाकताना पेपरवरून ते पूर्णपणे न निघून येता, पपेरला चिकटते.  यात प्लास्टिक तव्याला चिटकू  नये म्हणून देखील काळजी घ्यावी लागते.
तिसरी पद्धत म्हणजे ओल्या सुती कापडाचा वापर करून थालीपीठ थापू शकता. यावर पाहिजे तेवढे पातळ आणि मोठे थालीपीठ थापता येते. तसेच कापडाला थालीपीठ चिकटत नाही अथवा कापड तव्याला चिकटत नाही. तुम्ही अगदी नवशिके असला तरी थालीपीठ चुकणार नाही. त्यामुळे हि पद्धत अगदी उत्तम आहे. एखादा कॉटन चा रुमाल तुम्ही थालीपीठ बनवण्यासाठी खास किचन मध्ये ठेवू शकता.


   तर पोळपाटाच्या आकाराचा सुती कापड ओला करून घ्या. यावर पिठाचा मोठ्ठा गोळा ठेवा.हाताला पाणी लावून, बोटानी गोळा एकसारखा पसरावा. सुरवातीला गोळा थोडा थापून नंतर बोटानी काठ पुढे सरकवायचे आहेत. शेवटी मधला भाग दाबून एखासारखे थालीपीठ थापावे. मधून मधून पाण्याचा हात लावावा. मध्यभागी बोटानी होल पाडा. नंतर त्याभोवती, काठांच्या जवळ चार  होल पाडावेत. यात तेल सोडले की ते सर्व थालीपीठाला लागते आणि थालीपीठ जाड असूनही खुसखुशीत भाजली जातात.


    पूर्णपणे गरम झालेल्या तवावर कापडासहित थालीपीठ अलगद सोडा. कापड वरच्या बाजूला असले पाहिजे आणि थालीपीठ तव्याला चिटकले पाहिजे.अलगदपणे कापड काढून घ्या. ओले असल्यामुळे कापड लगेच सुटेल आणि गरम तव्याला थालीपीठ चिकटतील.आठ होलमध्ये तेल सोडा. झाकण घालून थालीपीठ मध्यम आचेवर वाफवून घ्या. थालपीठ थोडी जाड असल्यामुळे ती व्यवस्थित भाजली जावी याकरता झाकण घालावे. तेलेलामुळे तव्याकडचा भाग कुरकुरीत भाजला जाईल. २ मिनिटानंतर झाकण काढून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. २-३ थालीपीठानंतर कापडात पाणी कमी होते व पीठ चिकटते त्यामुळे २-३ थापीठानंतर कापड धुवून परत वापरावे.

गरम- गरम थालपीठावर लोण्याचा गोळा किंवा तूप घाला. दही किंवा लोणच्याबरोबर  थालपीठ मस्त लागतात.

संपूर्ण कृतीचा video :

Tuesday, February 7, 2017

मसाला भेंडी

 

    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!
आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मसाला भेंडी.जर तुम्हाला भेंडीची भाजी  आवडते आणि काहीतरी मसालेदार खाण्याची इच्छा असेल तर हि भाजी नक्की करून बघा.यासाठी लागणारे साहित्य आहे.
साहित्य:
पाव किलो भेंडी - भेंडी ताजी आणि कोवळी असावी.मोठी भेंडी असेल तर एकीचे दोन भाग करून वापरावी.
वाटण बनवण्यासाठी-
आलं,लसूण
कोथिंबीर, तीळ


फोडणीसाठी-
जिरे, मोहरी
हिंग, हळद
लाल तिखट
गरम मसाला
पावभाजी मसाला
कृती:
१. भेंडी धुवून ,पुसून, देठ काढून घ्या. भेंडीला मध्यभागी काप द्या.यामुळे मसाला भेंडीत मुरेल.
२. वाटण बनवण्यासाठी मिक्सर च्या छोट्या भांड्यात १ चमचा जिरे, तीळ, आलं, ३-४ लसणाच्या कुड्या, २ कोथिंबिरीच्या काड्या, २ चमचे सुक्या खोबऱ्याचा किस टाकावा.पाणी न घालता वाटण वाटून घ्यावे.
३.कढईत २ चमचे तेल गरम करावे. तेलात जिरे, मोहरी, hing,कढीपत्त्याची फोडणी करावी. तेलात चिरलेली भेंडी टाकावी. भेंडी तेलात छान परतून घ्यावी. या भाजीला आपण झाकण घालणार नाही आहोत,तयमाउली भेंडी तेलात फ्राय करावी.

४.भेंडी मऊ झाली कि त्यात केलेले वाटण टाकावे. वाटण तेलात २ मिनिटे परतावे.
५.यात क्रमाने गरम मसाला, पावभाजी मसाला, लाला तिखट आणि हळद टाकावे. सर्व व्यवस्थित मिक्स करा. 

६.आता यात पाव कप कोमट पाणी टाका. पाणी खूप जास्त न टाकता, फक्त मसाला भेंडीला लागेल इतपत टाकावे. पाणी आटले कि गॅस बंद करा.

संपूर्ण कृतीचा video :  






Friday, February 3, 2017

अळिवाचे लाडू 


    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
आजची रेसिपी आहे अळीव चे लाडू. अळीव हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने युक्त  असतात. लहान मुलांसाठी अळीव अतिशय पौष्टिक असतात.तसेच आजारी असेल तर अळिवाची खीर दिली जाते. अळीव  चे लाडू थंडीच्या दिवसात अतिशय उपयुक्त असतात. कंबरदुखीवर देखील अळिवाचे लाडू खाण फायदेशीर आहे. बाळंतपणात अळीव लाडू खाल्ले जातात. आळीव पाण्यात भिजवले असता ते पाणी शोषून सब्जाप्रमाणे फुलून येतात. अळिवाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य आहे:

साहित्य:
१ छोटी वाटी अळीव                                 
१ नारळ
१/२  वाटी दुधाची साय(क्रीम)
साखर अथवा गूळ


कृती:
१.नारळ फोडून घ्यावा. नारळाच्या पाण्यात अळीव  भिजवावा. कमीतकमी आळिवाच्या दुप्पट पाणी असावे. नारळाचे पाणी नसल्यास सध्या पाण्यात अळीव भिजवावा.
२. अळीव १५ ते २० मिनिटे भिजू द्यावेत. १५ मिनिटांनंतर अळीव  छान फुलून येतील. भिजून ते दुप्पट होतील.
३. नारळ खोवून घ्यावा. नाहीतर नारळाचे काप करून तो मिक्सरमध्ये पाणी न घालता फिरवावा. यामुळे नारळ खोवल्याप्रमाणे बारीक होईल. भिजलेल्या आळिवाच्या दुप्पट नारळ घ्यावा.

४. आता भांड्यात भिजवलेले आळीव, आळिवाच्या दुप्पट नारळाचा कीस(चव) आणि तिप्पट साखर घालून मिक्स करा. यात १ वाटी दुधाची साय घालून परत मिक्स करा.
५. कढईत सर्व मिश्रण घालून माध्यम आचेवर साखर विरघळेपर्यंत परतत राहा.साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता.यात साय घातल्यामुळे तूप घायची गरज नाही. साय नसेल तर त्याऐवजी  दूध घालू शकता.
६.साखर पूर्णपणे विरघळली की अजून २ मिनिटे परत. आळीव पारदर्शक झाला की गॅस बंद करा.

७.मिश्रण कोमट झाले की माध्यम आकाराचे लाडू वळा.हे लाडू २-३ दिवस फ्रिजशिवाय राहतात, नंतर मात्र ते फ्रिज मध्ये ठेवावेत. लाडू २ आठवडे फ्रिज मध्ये चांगले राहतात.
 
संपूर्ण कृतीचा video :

Monday, January 30, 2017

रव्याचे आप्पे


    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. रोज-रोज नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न कधीनाकधी सगळ्यांना  पडतोच. पोहे-उपीट हे नेहमीचे झटपट होणारे पदार्थ सोडले तर इडली-डोसा अश्या पदार्थाना १ दिवस आधी पूर्वतयारी लागते. त्यामुळे आयत्या वेळी झटपट नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतोच. त्यामुळे आजची रेसिपी आहे करायला झटपट आणि सोप्पे रव्याचे आप्पे. रव्याचे आप्पे करण्यासाठी फार काही पूर्वतयारीची गरज नाही. घरी पाहुणे किंवा मित्रमंडळी आली तरीदेखील करायला हा पदार्थ सोप्पा आणि सुटसुटीत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलं देखील आप्पे आवडीने खातात. यासाठी लागणार साहित्य देखील नेहमी घरात उपलब्ध असत.
साहित्य(२ जणांसाठी )
जाड रवा (२ मोठी वाटी/कप)           
दही(१ वाटी/कप )
कांदा १                                                                 
टोमॅटो १
कोथिंबीर
खाण्याचा सोडा

चटणीसाठी :      
डाळ
ओला नारळ (ऐच्छिक)
हिरवी मिरची
आलं-कोथिंबीर
लिंबू

कृती:
१. १ कप दह्यामध्ये २ कप पाणी घालून, घुसळून ताक बनवा. इथे शक्यतो आंबट दही वापरावे.
२. जाड रव्यामध्ये हे ताक घालून रवा भिजवावा. गरज पडल्यास पाणी घालावे. हे पीठ डोश्याच्या पिठाप्रमाणे सैलसर असावे.
३. २० मिनिटे हे पीठ भिजू द्यावे. खूप जास्त वेळ हे पीठ भिजवायची गरज नाही.
४. पीठ भिजेपर्यन्त मधल्या वेळेत कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
५. तसेच आप्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवू शकता. चटणीसाठी थोडं डाळ, थोडा ओला नारळाचे काप,कोथिंबीर, हिरवी मिरची,जिरे,आलं,मीठ आणि थोडं पाणी हे साहित्य मिक्सर च्या लहान भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. यात आंबटपणासाठी लिंबू पिळा. आवडीप्रमाणे तुम्ही इतर कुठलीही चटणी बनवू शकता.
६. २० मिनिटानंतर राव भिजून पीठ घट्ट होईल, यात थोडे पाणी घालून इडली च्या पिठाप्रमाणे सैलसर करा. यात चालेल कांदा,टोमॅटो व कोथिंबीर घाला.चवीपुरते मीठ घालून, सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.

७. आप्पेपात्र गरम करायला ठेवा. पूर्णपणे गरम झाल्यावर प्रत्येक साच्यात थोडे तेल सोडा.थोडे पीठ बाउल मध्ये घेऊन यात 1tsp(टीस्पून) खाण्याचा सोडा घालून व्यस्थित मिक्स करा.
८. चमच्याने हे पीठ आप्पेपात्रात सोडा. झाकण घालून आप्पे मध्यम आचेवर  ३-4 मिनिटे शिजू द्या.
९.आप्पे चॅन फुलून आल्यावर ते दुसऱ्या बाजूने पलटा.  दुसरीबाजूने देखील २-३ मिनिटे झाकण न घालता शेकून घ्या.
१०. याप्रमाणे प्रत्येकवेळेस बाउल मध्ये थोडे-थोडे पीठ सोडा घालून बनवा. सोडा आप्पे करायच्यावेळी घातल्याने आप्पे छान फुलतील.
११. जास्त जणांसाठी आप्पे करायचे असल्यास, आप्पे आधी करू शकता. खाण्याच्यावेळी आप्पेपात्रात गरम करून सर्व करू शकता.
१२. अश्याप्रकारे गरम-गरम आप्पे चटणीसोबत सर्व्ह करा.
संपूर्ण कृतीचा video :



Friday, January 27, 2017

 गव्हाची खीर


    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये! मराठी खाद्यसंस्कृतीत जे पारंपरिक गोडाचे पदार्थ आहे त्यांपैकी एक पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. सणांमध्ये विशेषकरून हनुमान जयंतीला अथवा शुभककार्यात गव्हाच्या खिरीला मनाचे स्थान आहे.पूर्वी लग्नसमारंभात किंवा कुठल्याही मोठ्या समारंभात गव्हाची खीर केली जायची.चुलीवर रात्रभर शिजवून केल्या जाणाऱ्या गव्हाच्या खीरीची चव रेंगाळत राहायची. आज विविध  पदार्थांच्या रेलचेलीत गव्हाची खीर तितकीशी केली जात नाही. 

गव्हाच्या खिरीसाठी खपली गहू म्हणजेच जोड गहू वापरला जातो.हा गहू नेहमीच्या गव्हापेक्षा लालसर रंगाचा असतो. तो चवीला थोडा गोडसर असल्यामुळे खिरीसाठी वापरला जातो. खपली गव्हाला पाणी लावून, तो जात्यावर दळून त्याची साल काढून तो खिरीसाठी वापरला जात असे. आता गिरणीत हे गहू सडले(पॉलिश केले) जातात.बाजारात हे गहू खिरीचे गहू म्हणून मिळतात.खपली गव्हात फायबर चे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते अतिशय पौष्टिक असतात.
 साहित्य :
  १ मोठी वाटी खिरीचे गहू
  गूळ                                            
 ओल्या नारळाचे काप
आलं अथवा सुंठ
खसखस,बडीशेप,वेलदोडे

कृती:
१. कुकर मध्ये पाणी उकळण्यास ठेवा, पाणी उकळायला लागले  की त्यात धुतलेले गहू टाका.
गहू २० मिनिटे शिजू  द्यावेत. उकळताना गव्हातील पाणी लवकर आटते, त्यामुळे वर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवावे. हे पाणी कोमट झाले कि ते गव्हात घालत राहावे.
२. अशा प्रकारे २० मिनिटानंतर गहू छान फुलून येतील.मग कुकरचे झाकण लावून मंद आचेवर ६ ते ७ शिट्ट्या घ्याव्यात.

३. मधल्या वेळेत गहू शिजेपर्यंत १ चमचा खसखस आणि १ चमचा बडीशेप भाजून घ्यावी. ३-४ सोललेले वेलदोडे, भाजलेली खसखस-बडीशेप मिक्सर मधून काढावी. यात १ इंच आले टाकून पुन्हा बारीक वाटावे. गहू पचायला जड असतात. बडीशेप आणि आल्यामुळे पचनास मदत होते. आल्या ऐवजी सुंठ देखील वापरू शकता.
४. कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यावर गहू शिजले आहेत का नाही ते चेक करा. गहू भाताच्या शीताप्रमाणे पूर्णपणे शिजला पाहिजे. शिजला नसेल तर थोडे पाणी घालून परत २-३ शिट्ट्या घ्या. त्याचप्रमाणे गहू शिजल्यावर पाणी आटून कोरडा झाला असेल तर त्यात थोडे उकळते पाणी घालू शकता. रवीने गहू वरण घोटतो त्याप्रमाणे घोटून घ्या.
५. आता कुकरचा गॅस पुन्हा चालू करा. खिरीत आवडीप्रमाणे गूळ, ओल्या नारळाचे काप आणि वर तयार केलेला मसाला टाका. सर्व साहित्य नीट मिक्स करा. यात अगदी चिमूटभर मीठ टाका. गूळ पूर्णपणे विरघळला आणि उकळी आली की गॅस बंद करा.

६. गरम-गरम खिरीवर दूध आणि तूप घालून खीर सर्व्ह करा. खीर जास्तवेळ मुरल्यावर आणखी छान लागते.


यात तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटस देखील घालू शकता.
Complete Video:

Thursday, January 26, 2017

सोलकढी  



नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. कोकणची खाद्यसंस्कृती म्हटली  कि सोलकढीची आठवण  झाल्याशिवाय राहत नाही. कोकणात फिरायला गेलेला माणूस, तो शाहकारी असो अथवा मांसाहारी, तो सोलकढीची चव घेतल्याशिवाय परत येत नाही. मांसाहारी जेवणानंतर  अॅसिडिटी होऊ नये व पचन चांगले व्हावे यासाठी सोलकढी उपयुक्त आहे. 
कोकम आणि नारळाच्या दुधापासून सोलकढी बनवली जाते. त्यामुळे तीला  कोकमकढी असेही म्हटले जाते. सोलकढी साठी नारळ घेताना खूप जुना नारळ वापरू  नये.नारळ कोवळा असावा. तसेच फ्रिज मध्ये ठेवलेला नारळ वापरू नये. सोलकढी बनवताना कोकम भिजवून त्याचा गर वापरला जातो. पण आता सगळीकडदे कोकमाचा अर्क म्हणजेच कोकम आगळ मिळत असल्यामुळे तो वापरला जातो.  त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी यात लसूण घातला जातो, पण थोड्यावेळानंतर कच्च्या लसणाचा वास येतो व सोलकढी जास्त वेळ ठेवता नाही. त्यामुळे याठिकाणी मी फक्त  आलं घालून सोलकढी केली आहे. सोलकढीला चॅन गुलाबी रंग यावा म्हणून मी याठिकाणी बीट चा वापर केला आहे. याने सोलकढी ला रंग पण छान येतो आणि शिवाय रंग नैसर्गीकही आहे.
  
साहित्य:              
 १ नारळ
२-३ tsp कोकम आगळ
आलं
जिरे
कोथिंबीर
हिरवी मिरची
बीटाचा छोटा तुकडा
चवीपुरते मीठ आणि साखर

कृती:
१. नारळ फोडून , खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्या.
२. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात नारळाचे काप, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा आल्याचा तुकडा,बीटाचा तुकडा टाका. प्रथम अर्धा ग्लास पाणी टाकून सर्व बारीक वाटून घ्यावे.
३. पुन्हा यात १ ग्लास पाणी घालून मिक्सरवर वाटावे.
४. बारीक चाळणीने गाळून, नारळाचे दूध काढून घ्यावे.
५. नारळाच्या चोथ्यामध्ये थोडे(१ ग्लास) पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे.
६.नारळाचे हे दूध खूप पातळ अथवा खूप घट्ट नसावे.




७.आता यात २ मोट्ठे चमचे कोकम आगळ आणि चवीपुरते मीठ टाकावे. सोलकढी व्यवस्थित हलवून घ्यावी.चव बघून कोकम आगळ कमी-जास्त करावा.
८. शेवटी १ छोटा चमचा साखर, मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सोलकढी मिक्स करावी.
९. फ्रिज मध्ये १५ मिनिटे ठेवून सोलकढी सर्व्ह करावी. १ नारळापासून ४ ते ५ छोटे ग्लास सोलकढी होते.




Monday, January 23, 2017

मटार पुलाव

 

नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. थंडीचे दिवस आले कि बाजारात ताजे मटार उपलब्ध होतात. हिरवेगार ताजे मटार वापरून विविध पदार्थ केले जातात. तेव्हा एकदातरी हा मटार पुलाव झालाच पाहिजे.

साहित्य :
१ कप अख्खा बासमती तांदूळ
१ वाटी मटारचे दाणे
१ कांदा
१ टोमॅटो
थोडी पुदिन्याची पाने
१ चमचा आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट


खडा/ अख्खा गरम मसाला:
१ tsp जिरे                                    

४-५ लवंग
दालचिनी
काली मिरी
तमालपत्र


 

कृती: 
१. प्रथम तांदूळ २० मिनिटे भिजून निथळून घ्यावा, यामुळे भात  छान  फुलून येतो.
२. कांदा व टोमॅटो पातळ उभे चिरून घ्या. मिरचीचे तुकडे करा व पुदिना बारीक चिरून घ्या.
३.  कुकर मध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला टाका.
४.  यात चिरलेला कांदा टाकून तो गुलाबीसर रंगावर परतून घ्या.
५. आता यात मिरची व मटार चे दाणे टाकून परतून घ्या.
६. शेवटी टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट व पुदिन्याची पाने टाकून हलवून घ्या.

 


७. याठिकाणी भाज्या खूप जास्त वेळ न शिजू देता फक्त गडद रंगाच्या होईपर्यंत तेलात परताव्यात.
८. यात निथळलेला तांदूळ टाकून २ मिनिटे परतावे.
९. १ कप तांदळासाठी दीड कप गरम पाणी टाकावे.
१०. पाण्याला उकळी आल्यावर कुकरचे झाकण लावून २ शिट्ट्या घ्याव्यात.
११. कुकरचे झाकण उघडून वाफ पूर्णपणे जाऊ द्यावी.शेवटी वरून  तळलेले काजू व चरलेली कोथिंबीर घालून पुलाव वाढावा.