Wednesday, February 22, 2017

कमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे | साबुदाणा टिक्की 



नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये !!
उपवास असो व नसो साबुदाणा वडे सगळ्यांनाच आवडतात.गरम-गरम कुरकुरीत साबुदाणा वडे, उपवासाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी उपवास असणं गरजेचं नाही. तेलकट असल्यामुळे बऱ्याचवेळा वड्याऐवजी खिचडी करतो. जर न तळता कमी तेलात वडे बनवायचे असतील तर ते आप्पेपात्रात बनवावेत. यामुळे कमी तेलात तितकेच स्वादिष्ट साबुदाणा वडे बनतात.
यासाठी लागणार साहित्य आहे
१ मोठी वाटी भिजवलेला साबुदाणा
१/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
२ उकडलेले बटाटे
१ चमचा मिरची-जिरे पेस्ट
कोथिंबीर
लिंबू
कृती.
१. साबुदाणा आदल्या रात्री भिजवून  घ्यावा. यासाठी प्रथम साबुदाणा धुवून,निथळून घ्यावा. मग त्यात साबुदाणा हलकासा भिजेल इतपत म्हणजे साबुदाण्याच्या लेवल पर्यत पाणी ठेवून, झाकण ठेवून तो रात्रभर(३-४ तास )भिजू द्यावा. भिजल्यानंतर साबुदाणा छान फुलून कोरडा झाला पाहिजे.
२. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करावा. खिचडी साठी अथवा वड्यांसाठी शेंगदाणे भाजताना प्रथम ते माध्यम आचेवर थोड्यावेळ भाजावेत, नंतर मंद आचेवर छान खरपूस वास सुटेपर्यंत भाजावेत. मंद आचेवर भाजल्यामुळे शेंगदाणे आतपर्यंत, छान भाजले जातात. नंतर ते पूर्ण थंड होऊ द्यावेत आणि मग त्याचा जाडसर कूट करावा.

३ भिजवलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट घाला व व्यवस्थित मिक्स करा. सगळ्या साबुदाण्याला व्यवस्थित कूट लागेल इतपत कूट घालावा. साधारण १/२ वाटी कूट, १ वाटी साबुदाण्याला लागेल. साबुदाणा शिजला कि चिकट  होतो, त्यामुळे कूटाने चिकटपणा कमी होतो म्हणून वड्यांसाठी थोडा जास्त कूट घालावा.
४. आता यात उकडलेला बटाटा कुस्करून घाला.पाणी न घालता साबुदाणा वड्याचे पीठ मळता येईल इतपत बटाटा लागेल.
५. यात चवीपुरते मीठ, जिरे-मिरची ची पेस्ट आणि बारीक चिरलेली  कोथिंबीर टाका. १ चमचा लिंबाचा रस घाला.
६.सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्या.
७.आता हाताला तेल लावून पिठाचे आप्पेपात्रात बसतील अश्या आकाराचे गोळे करा.दोन्ही हातांनी गोळ्यांना मधोमध दाब द्या. सर्व पिठाचे गोळे बनवून घ्या.

८. आप्पेपात्र माध्यम आचेवर पूर्णपणे गरम करून घ्या. चमच्याने यात तेल सोडा. याठिकाणी तेलाऐवजी तूप देखील वापरता येईल. पहिल्या घाण्याला थोडे जास्त तेल लागेल नंतर तेल कमी-कमी लागत जाईल. शेवटी-शेवटी तेल न घालता देखील छान वडे बनतील. त्याचप्रमाणे नॉनस्टिक चे आप्पेपात्र असेल तरीदेखील कमी तेल लागेल. आप्प्याचं साचा मोठ्ठा असेल तर छान मोठ्ठे वडे करता येतील.
९. यात वडे अलगद सोडा. झाकण घालून ७-८ मिनिटे शिजू द्या. वडे छान खरपूस रंगाचे झाले कि आपपत्रापासून आपोआप सुटतील. चिकटले असतील तर थोडे अजून शेकू द्या नंतर चमच्याने हलके सोडवून घ्या.

१०. दुसऱ्या बाजूनेदेखील वडे शेकून घ्या. शक्यतो घालावे तेल लागणार नाही.
११. वड्यासोबत खाण्यासाठी झटपट चटणी बनवायची असल्यास दही, शेंगदाण्याचा कूट, जिरे, मीठ आणि लाल तिखट मिक्सरमध्ये फिरवून चटणी करू शकता.
१२. गरम-गरम वडे चटणीबरोबर सर्व्ह करा.
संपूर्ण कृतीचा video :