गव्हाची खीर
गव्हाच्या खिरीसाठी खपली गहू म्हणजेच जोड गहू वापरला जातो.हा गहू नेहमीच्या गव्हापेक्षा लालसर रंगाचा असतो. तो चवीला थोडा गोडसर असल्यामुळे खिरीसाठी वापरला जातो. खपली गव्हाला पाणी लावून, तो जात्यावर दळून त्याची साल काढून तो खिरीसाठी वापरला जात असे. आता गिरणीत हे गहू सडले(पॉलिश केले) जातात.बाजारात हे गहू खिरीचे गहू म्हणून मिळतात.खपली गव्हात फायबर चे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते अतिशय पौष्टिक असतात.
साहित्य :
१ मोठी वाटी खिरीचे गहू
गूळ
ओल्या नारळाचे काप
आलं अथवा सुंठ
खसखस,बडीशेप,वेलदोडे
कृती:
१. कुकर मध्ये पाणी उकळण्यास ठेवा, पाणी उकळायला लागले की त्यात धुतलेले गहू टाका.
गहू २० मिनिटे शिजू द्यावेत. उकळताना गव्हातील पाणी लवकर आटते, त्यामुळे वर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवावे. हे पाणी कोमट झाले कि ते गव्हात घालत राहावे.
२. अशा प्रकारे २० मिनिटानंतर गहू छान फुलून येतील.मग कुकरचे झाकण लावून मंद आचेवर ६ ते ७ शिट्ट्या घ्याव्यात.
३. मधल्या वेळेत गहू शिजेपर्यंत १ चमचा खसखस आणि १ चमचा बडीशेप भाजून घ्यावी. ३-४ सोललेले वेलदोडे, भाजलेली खसखस-बडीशेप मिक्सर मधून काढावी. यात १ इंच आले टाकून पुन्हा बारीक वाटावे. गहू पचायला जड असतात. बडीशेप आणि आल्यामुळे पचनास मदत होते. आल्या ऐवजी सुंठ देखील वापरू शकता.
४. कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यावर गहू शिजले आहेत का नाही ते चेक करा. गहू भाताच्या शीताप्रमाणे पूर्णपणे शिजला पाहिजे. शिजला नसेल तर थोडे पाणी घालून परत २-३ शिट्ट्या घ्या. त्याचप्रमाणे गहू शिजल्यावर पाणी आटून कोरडा झाला असेल तर त्यात थोडे उकळते पाणी घालू शकता. रवीने गहू वरण घोटतो त्याप्रमाणे घोटून घ्या.
५. आता कुकरचा गॅस पुन्हा चालू करा. खिरीत आवडीप्रमाणे गूळ, ओल्या नारळाचे काप आणि वर तयार केलेला मसाला टाका. सर्व साहित्य नीट मिक्स करा. यात अगदी चिमूटभर मीठ टाका. गूळ पूर्णपणे विरघळला आणि उकळी आली की गॅस बंद करा.
६. गरम-गरम खिरीवर दूध आणि तूप घालून खीर सर्व्ह करा. खीर जास्तवेळ मुरल्यावर आणखी छान लागते.
यात तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटस देखील घालू शकता.
Complete Video:
खूप चविष्ट आणि पारंपरिक खीर👌👍
ReplyDelete