Monday, January 30, 2017

रव्याचे आप्पे


    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. रोज-रोज नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न कधीनाकधी सगळ्यांना  पडतोच. पोहे-उपीट हे नेहमीचे झटपट होणारे पदार्थ सोडले तर इडली-डोसा अश्या पदार्थाना १ दिवस आधी पूर्वतयारी लागते. त्यामुळे आयत्या वेळी झटपट नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतोच. त्यामुळे आजची रेसिपी आहे करायला झटपट आणि सोप्पे रव्याचे आप्पे. रव्याचे आप्पे करण्यासाठी फार काही पूर्वतयारीची गरज नाही. घरी पाहुणे किंवा मित्रमंडळी आली तरीदेखील करायला हा पदार्थ सोप्पा आणि सुटसुटीत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलं देखील आप्पे आवडीने खातात. यासाठी लागणार साहित्य देखील नेहमी घरात उपलब्ध असत.
साहित्य(२ जणांसाठी )
जाड रवा (२ मोठी वाटी/कप)           
दही(१ वाटी/कप )
कांदा १                                                                 
टोमॅटो १
कोथिंबीर
खाण्याचा सोडा

चटणीसाठी :      
डाळ
ओला नारळ (ऐच्छिक)
हिरवी मिरची
आलं-कोथिंबीर
लिंबू

कृती:
१. १ कप दह्यामध्ये २ कप पाणी घालून, घुसळून ताक बनवा. इथे शक्यतो आंबट दही वापरावे.
२. जाड रव्यामध्ये हे ताक घालून रवा भिजवावा. गरज पडल्यास पाणी घालावे. हे पीठ डोश्याच्या पिठाप्रमाणे सैलसर असावे.
३. २० मिनिटे हे पीठ भिजू द्यावे. खूप जास्त वेळ हे पीठ भिजवायची गरज नाही.
४. पीठ भिजेपर्यन्त मधल्या वेळेत कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
५. तसेच आप्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवू शकता. चटणीसाठी थोडं डाळ, थोडा ओला नारळाचे काप,कोथिंबीर, हिरवी मिरची,जिरे,आलं,मीठ आणि थोडं पाणी हे साहित्य मिक्सर च्या लहान भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. यात आंबटपणासाठी लिंबू पिळा. आवडीप्रमाणे तुम्ही इतर कुठलीही चटणी बनवू शकता.
६. २० मिनिटानंतर राव भिजून पीठ घट्ट होईल, यात थोडे पाणी घालून इडली च्या पिठाप्रमाणे सैलसर करा. यात चालेल कांदा,टोमॅटो व कोथिंबीर घाला.चवीपुरते मीठ घालून, सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.

७. आप्पेपात्र गरम करायला ठेवा. पूर्णपणे गरम झाल्यावर प्रत्येक साच्यात थोडे तेल सोडा.थोडे पीठ बाउल मध्ये घेऊन यात 1tsp(टीस्पून) खाण्याचा सोडा घालून व्यस्थित मिक्स करा.
८. चमच्याने हे पीठ आप्पेपात्रात सोडा. झाकण घालून आप्पे मध्यम आचेवर  ३-4 मिनिटे शिजू द्या.
९.आप्पे चॅन फुलून आल्यावर ते दुसऱ्या बाजूने पलटा.  दुसरीबाजूने देखील २-३ मिनिटे झाकण न घालता शेकून घ्या.
१०. याप्रमाणे प्रत्येकवेळेस बाउल मध्ये थोडे-थोडे पीठ सोडा घालून बनवा. सोडा आप्पे करायच्यावेळी घातल्याने आप्पे छान फुलतील.
११. जास्त जणांसाठी आप्पे करायचे असल्यास, आप्पे आधी करू शकता. खाण्याच्यावेळी आप्पेपात्रात गरम करून सर्व करू शकता.
१२. अश्याप्रकारे गरम-गरम आप्पे चटणीसोबत सर्व्ह करा.
संपूर्ण कृतीचा video :



No comments:

Post a Comment