Tuesday, August 8, 2017

सांडग्याची सुकी भाजी | Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji

सांडग्याची सुकी भाजी | Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji 


नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन  मध्ये !!
सांडगे हा वाळवणाचा पदार्थ असा एक अत्यंत उपयोगी आहे कि जो फक्त तोंडीलावणं म्हणून न वापरता कधीही चटकदार अशी भाजी बनवली जाऊ शकते.उन्हाळयात करून ठेवलेले सांडग्यांची वर्षभरात कधीही भाजी भाजी बनवू शकता. जेव्हा कधीही फ्रिज मध्ये भाजी नसेल, आणि काही तरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली कि बरणीतून सांडगे काढून कधीही सांडग्याची भाजी करता येते. शिवाय भाजी निवडा, चिरा या भानगडी नसल्यामुळे कमीत कमी वेळेत होते. आवडीप्रमाणे सांडग्याची भाजी सुकी किंवा थोडी रस्सेदार बनवू शकतो. सांडग्याची झणझणीत भाजी, भाकरी जोडीला ताक .....खरंच अप्रतिम  !!!

सांडग्याच्या भाजी चे साहित्य- Ingredients For Sandgyachi Bhaji

२ वाट्या सांडगे,
२ मोट्ठे कांदे(बारीक चिरून ),
१ टोमॅटो(बारीक चिरून ),
२-३ tsp खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट,
घरगुती काळा मसाला(कांदा लसूण मसाला)
फोडणीसाठी जिरे, मोहरी कढीपत्ता(ऐच्छिक)

 

कृती- How to make Sandgyachi Bhaji

१.कढईत १ tsp तेल गरम करून त्यात सांडगे भाजून घ्यावेत. सांडगे भाजताना सुरवातीला गॅस माध्यम आचेवर असावा व नंतर तो मंद आचेवर करावा. म्हणजे सांडगे खरपूस भाजले जातील.
सांडग्यांचा रंग बदलून तो सोनेरी झाला व ते छान आतपर्यंत भाजले गेले कि कढईतून काढावेत.
२. त्याच कढईत थोडेसे तेल घालावे. सांडगे तेलात भाजले असल्यामुळे त्याला असलेले तेल लक्षात घेऊन बेताचेच कांदा परतेल इतपत तेल घालावे. तेलाला जिरे , मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यावी.
३. आता यात चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा.
४. यात छोटा चमचा हळद घालावी. चिरलेला टोमॅटॊ घालून परतून घ्यावे. आवडीनुसार १ ते २ चमचे कांदा-लसूण मसाला/ काळा मसाला यात घालावा. सर्व व्यवस्थित परतून घ्यावे. काळा मसाला नसल्यास लाल तिखट घातले तरी चालेल.

५. भाजलेले सांडगे घळलावेत. सर्व एकदा परतून यात गरजेनुसार कोमट पाणी घालावे. चवीपुरते(सांडग्याचे मीठ लक्षात घेऊन ) मीठ घालावे.
६. सांडगे ५ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावेत. सांडग्याचे शिजणे हे सांडग्यांचा आकार, पिठाचा रवाळपणा व ते किती खरपूस भाजले आहेत यावर ठरते. जर सांडगे मोट्ठे असतील तर शिजायला वेळ लागतो.
७. एखादा सांडगा घेऊन तो बोटाने आतपर्यंत शिजला आहे का ते पाहावे. सांडगा खूप जास्त देखील मऊ शिजवू नये. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालावा. सर्व व्यवस्थित मिक्स करून शेवटी गॅस बंद करावा.

संपूर्ण कृतीचा Video: Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji 


No comments:

Post a Comment