Friday, January 27, 2017

 गव्हाची खीर


    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये! मराठी खाद्यसंस्कृतीत जे पारंपरिक गोडाचे पदार्थ आहे त्यांपैकी एक पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. सणांमध्ये विशेषकरून हनुमान जयंतीला अथवा शुभककार्यात गव्हाच्या खिरीला मनाचे स्थान आहे.पूर्वी लग्नसमारंभात किंवा कुठल्याही मोठ्या समारंभात गव्हाची खीर केली जायची.चुलीवर रात्रभर शिजवून केल्या जाणाऱ्या गव्हाच्या खीरीची चव रेंगाळत राहायची. आज विविध  पदार्थांच्या रेलचेलीत गव्हाची खीर तितकीशी केली जात नाही. 

गव्हाच्या खिरीसाठी खपली गहू म्हणजेच जोड गहू वापरला जातो.हा गहू नेहमीच्या गव्हापेक्षा लालसर रंगाचा असतो. तो चवीला थोडा गोडसर असल्यामुळे खिरीसाठी वापरला जातो. खपली गव्हाला पाणी लावून, तो जात्यावर दळून त्याची साल काढून तो खिरीसाठी वापरला जात असे. आता गिरणीत हे गहू सडले(पॉलिश केले) जातात.बाजारात हे गहू खिरीचे गहू म्हणून मिळतात.खपली गव्हात फायबर चे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते अतिशय पौष्टिक असतात.
 साहित्य :
  १ मोठी वाटी खिरीचे गहू
  गूळ                                            
 ओल्या नारळाचे काप
आलं अथवा सुंठ
खसखस,बडीशेप,वेलदोडे

कृती:
१. कुकर मध्ये पाणी उकळण्यास ठेवा, पाणी उकळायला लागले  की त्यात धुतलेले गहू टाका.
गहू २० मिनिटे शिजू  द्यावेत. उकळताना गव्हातील पाणी लवकर आटते, त्यामुळे वर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवावे. हे पाणी कोमट झाले कि ते गव्हात घालत राहावे.
२. अशा प्रकारे २० मिनिटानंतर गहू छान फुलून येतील.मग कुकरचे झाकण लावून मंद आचेवर ६ ते ७ शिट्ट्या घ्याव्यात.

३. मधल्या वेळेत गहू शिजेपर्यंत १ चमचा खसखस आणि १ चमचा बडीशेप भाजून घ्यावी. ३-४ सोललेले वेलदोडे, भाजलेली खसखस-बडीशेप मिक्सर मधून काढावी. यात १ इंच आले टाकून पुन्हा बारीक वाटावे. गहू पचायला जड असतात. बडीशेप आणि आल्यामुळे पचनास मदत होते. आल्या ऐवजी सुंठ देखील वापरू शकता.
४. कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यावर गहू शिजले आहेत का नाही ते चेक करा. गहू भाताच्या शीताप्रमाणे पूर्णपणे शिजला पाहिजे. शिजला नसेल तर थोडे पाणी घालून परत २-३ शिट्ट्या घ्या. त्याचप्रमाणे गहू शिजल्यावर पाणी आटून कोरडा झाला असेल तर त्यात थोडे उकळते पाणी घालू शकता. रवीने गहू वरण घोटतो त्याप्रमाणे घोटून घ्या.
५. आता कुकरचा गॅस पुन्हा चालू करा. खिरीत आवडीप्रमाणे गूळ, ओल्या नारळाचे काप आणि वर तयार केलेला मसाला टाका. सर्व साहित्य नीट मिक्स करा. यात अगदी चिमूटभर मीठ टाका. गूळ पूर्णपणे विरघळला आणि उकळी आली की गॅस बंद करा.

६. गरम-गरम खिरीवर दूध आणि तूप घालून खीर सर्व्ह करा. खीर जास्तवेळ मुरल्यावर आणखी छान लागते.


यात तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटस देखील घालू शकता.
Complete Video:

Thursday, January 26, 2017

सोलकढी  



नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. कोकणची खाद्यसंस्कृती म्हटली  कि सोलकढीची आठवण  झाल्याशिवाय राहत नाही. कोकणात फिरायला गेलेला माणूस, तो शाहकारी असो अथवा मांसाहारी, तो सोलकढीची चव घेतल्याशिवाय परत येत नाही. मांसाहारी जेवणानंतर  अॅसिडिटी होऊ नये व पचन चांगले व्हावे यासाठी सोलकढी उपयुक्त आहे. 
कोकम आणि नारळाच्या दुधापासून सोलकढी बनवली जाते. त्यामुळे तीला  कोकमकढी असेही म्हटले जाते. सोलकढी साठी नारळ घेताना खूप जुना नारळ वापरू  नये.नारळ कोवळा असावा. तसेच फ्रिज मध्ये ठेवलेला नारळ वापरू नये. सोलकढी बनवताना कोकम भिजवून त्याचा गर वापरला जातो. पण आता सगळीकडदे कोकमाचा अर्क म्हणजेच कोकम आगळ मिळत असल्यामुळे तो वापरला जातो.  त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी यात लसूण घातला जातो, पण थोड्यावेळानंतर कच्च्या लसणाचा वास येतो व सोलकढी जास्त वेळ ठेवता नाही. त्यामुळे याठिकाणी मी फक्त  आलं घालून सोलकढी केली आहे. सोलकढीला चॅन गुलाबी रंग यावा म्हणून मी याठिकाणी बीट चा वापर केला आहे. याने सोलकढी ला रंग पण छान येतो आणि शिवाय रंग नैसर्गीकही आहे.
  
साहित्य:              
 १ नारळ
२-३ tsp कोकम आगळ
आलं
जिरे
कोथिंबीर
हिरवी मिरची
बीटाचा छोटा तुकडा
चवीपुरते मीठ आणि साखर

कृती:
१. नारळ फोडून , खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्या.
२. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात नारळाचे काप, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा आल्याचा तुकडा,बीटाचा तुकडा टाका. प्रथम अर्धा ग्लास पाणी टाकून सर्व बारीक वाटून घ्यावे.
३. पुन्हा यात १ ग्लास पाणी घालून मिक्सरवर वाटावे.
४. बारीक चाळणीने गाळून, नारळाचे दूध काढून घ्यावे.
५. नारळाच्या चोथ्यामध्ये थोडे(१ ग्लास) पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे.
६.नारळाचे हे दूध खूप पातळ अथवा खूप घट्ट नसावे.




७.आता यात २ मोट्ठे चमचे कोकम आगळ आणि चवीपुरते मीठ टाकावे. सोलकढी व्यवस्थित हलवून घ्यावी.चव बघून कोकम आगळ कमी-जास्त करावा.
८. शेवटी १ छोटा चमचा साखर, मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सोलकढी मिक्स करावी.
९. फ्रिज मध्ये १५ मिनिटे ठेवून सोलकढी सर्व्ह करावी. १ नारळापासून ४ ते ५ छोटे ग्लास सोलकढी होते.




Monday, January 23, 2017

मटार पुलाव

 

नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. थंडीचे दिवस आले कि बाजारात ताजे मटार उपलब्ध होतात. हिरवेगार ताजे मटार वापरून विविध पदार्थ केले जातात. तेव्हा एकदातरी हा मटार पुलाव झालाच पाहिजे.

साहित्य :
१ कप अख्खा बासमती तांदूळ
१ वाटी मटारचे दाणे
१ कांदा
१ टोमॅटो
थोडी पुदिन्याची पाने
१ चमचा आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट


खडा/ अख्खा गरम मसाला:
१ tsp जिरे                                    

४-५ लवंग
दालचिनी
काली मिरी
तमालपत्र


 

कृती: 
१. प्रथम तांदूळ २० मिनिटे भिजून निथळून घ्यावा, यामुळे भात  छान  फुलून येतो.
२. कांदा व टोमॅटो पातळ उभे चिरून घ्या. मिरचीचे तुकडे करा व पुदिना बारीक चिरून घ्या.
३.  कुकर मध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला टाका.
४.  यात चिरलेला कांदा टाकून तो गुलाबीसर रंगावर परतून घ्या.
५. आता यात मिरची व मटार चे दाणे टाकून परतून घ्या.
६. शेवटी टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट व पुदिन्याची पाने टाकून हलवून घ्या.

 


७. याठिकाणी भाज्या खूप जास्त वेळ न शिजू देता फक्त गडद रंगाच्या होईपर्यंत तेलात परताव्यात.
८. यात निथळलेला तांदूळ टाकून २ मिनिटे परतावे.
९. १ कप तांदळासाठी दीड कप गरम पाणी टाकावे.
१०. पाण्याला उकळी आल्यावर कुकरचे झाकण लावून २ शिट्ट्या घ्याव्यात.
११. कुकरचे झाकण उघडून वाफ पूर्णपणे जाऊ द्यावी.शेवटी वरून  तळलेले काजू व चरलेली कोथिंबीर घालून पुलाव वाढावा.