Thursday, January 26, 2017

सोलकढी  



नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. कोकणची खाद्यसंस्कृती म्हटली  कि सोलकढीची आठवण  झाल्याशिवाय राहत नाही. कोकणात फिरायला गेलेला माणूस, तो शाहकारी असो अथवा मांसाहारी, तो सोलकढीची चव घेतल्याशिवाय परत येत नाही. मांसाहारी जेवणानंतर  अॅसिडिटी होऊ नये व पचन चांगले व्हावे यासाठी सोलकढी उपयुक्त आहे. 
कोकम आणि नारळाच्या दुधापासून सोलकढी बनवली जाते. त्यामुळे तीला  कोकमकढी असेही म्हटले जाते. सोलकढी साठी नारळ घेताना खूप जुना नारळ वापरू  नये.नारळ कोवळा असावा. तसेच फ्रिज मध्ये ठेवलेला नारळ वापरू नये. सोलकढी बनवताना कोकम भिजवून त्याचा गर वापरला जातो. पण आता सगळीकडदे कोकमाचा अर्क म्हणजेच कोकम आगळ मिळत असल्यामुळे तो वापरला जातो.  त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी यात लसूण घातला जातो, पण थोड्यावेळानंतर कच्च्या लसणाचा वास येतो व सोलकढी जास्त वेळ ठेवता नाही. त्यामुळे याठिकाणी मी फक्त  आलं घालून सोलकढी केली आहे. सोलकढीला चॅन गुलाबी रंग यावा म्हणून मी याठिकाणी बीट चा वापर केला आहे. याने सोलकढी ला रंग पण छान येतो आणि शिवाय रंग नैसर्गीकही आहे.
  
साहित्य:              
 १ नारळ
२-३ tsp कोकम आगळ
आलं
जिरे
कोथिंबीर
हिरवी मिरची
बीटाचा छोटा तुकडा
चवीपुरते मीठ आणि साखर

कृती:
१. नारळ फोडून , खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्या.
२. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात नारळाचे काप, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा आल्याचा तुकडा,बीटाचा तुकडा टाका. प्रथम अर्धा ग्लास पाणी टाकून सर्व बारीक वाटून घ्यावे.
३. पुन्हा यात १ ग्लास पाणी घालून मिक्सरवर वाटावे.
४. बारीक चाळणीने गाळून, नारळाचे दूध काढून घ्यावे.
५. नारळाच्या चोथ्यामध्ये थोडे(१ ग्लास) पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे.
६.नारळाचे हे दूध खूप पातळ अथवा खूप घट्ट नसावे.




७.आता यात २ मोट्ठे चमचे कोकम आगळ आणि चवीपुरते मीठ टाकावे. सोलकढी व्यवस्थित हलवून घ्यावी.चव बघून कोकम आगळ कमी-जास्त करावा.
८. शेवटी १ छोटा चमचा साखर, मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सोलकढी मिक्स करावी.
९. फ्रिज मध्ये १५ मिनिटे ठेवून सोलकढी सर्व्ह करावी. १ नारळापासून ४ ते ५ छोटे ग्लास सोलकढी होते.




1 comment: