Monday, April 17, 2017

कैरीची कांदा घालून चटणी  | Kairi Chutney | Raw Mango-Onion Chutney

 

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कैरीची कांदा घालून बनवलेली चटणी.
उन्हाळ्याच्या सुरवातीपासून बाजारात कैरी उपलब्ध होऊ लागली कि कैरीचे विविध पदार्थ बनवले जातात. थंडगार पन्ह्या पासून ते कैरीची डाळ, चटकदार लोणची, विविध चटण्यां पर्यंत रोज कैरीचे पदार्थ बनवले जातात.त्यांपैकीच एक माझी  आवडती कैरीची रेसिपी म्हणजे कांदा घालून केलेली कैरीची चटणी. आंबट-गोड आणि तिखट अशी हि चटणी तुम्ही देखील नक्की करून बघा.



साहित्य :                               

१ कैरी
१ मोठ्ठा कांदा
५-६ सोललेल्या लसणाच्या पाकळ्या 
थोडासा गूळ
जिरे-मोहरी,
हिंग ,
कढीपत्ता,
लाल तिखट,
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट.
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१. कैरीची साल काढून बारीक तुकडे करावेत. कैरी खुप आंबट असेल तर कमी प्रमाणात वापरावी.
२.  कांदा बारीक चिरून घ्यावा.
३. मिक्सर च्या छोट्या भांड्यात प्रथम १ छोटा चमचा जिरे,५-६ लसणाच्या पाकळ्या,कैरीचे तुकडे,
 आणि चवीपुरते मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. वाटताना पाणी वापरू नये.
४.यात बारीक चिरलेला कांदा, कैरीच्या आंबटपणानुसार १ चमचा बारीक केलेला गूळ घालावा. आवडीनुसार १ चमचा लाल तिखट यात घालावे. रंग छान येण्यासाठी १/२ चमचा काश्मिरी लाल तिखट यात घालू शकता.
५. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात थोडेसे मिक्स करून पुन्हा एकदा पाणी न घालता वाटून घ्या.


६.बाउल मध्ये हि चटणी काढून यात १ चमचा शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करावे.
७. थोडेसे तेल गरम करून जिरे-मोहरी-हिंग-कढीपत्त्याची कडकडीत फोडणी चटणीला द्यावी.
तयार आहे चटपटीत अशी कैरीची चटणी. या चटणीत कच्चा कांदा वापरला असल्यामुळे ती ताजीच करून दिवसभरात संपवावी.
संपूर्ण कृतीचा video :