धपाटे कसे करायचे ?
धपाटे हा थालपीठाशी साधर्म्य असणारा प्रकार,पण थालपीठांइतका केला जात नाही.धपाट्याना थालपीठाला लागते तशी भाजणी लागत नाही. सर्वसाधारण घरात उपलब्ध पीठ एकत्र करून धपाटे केले जातात. त्याच प्रमाणे यात भाज्या घातल्या जात नाहीत त्यामुळे अगदी पातळ थापता येतात. याला थालपीठां प्रमाणे होल करण्याची आवश्यकता नसते. थोडक्यात याला मसाला भाकरी किंवा मसाला पराठा म्हणता येईल. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हे धपाटे केले जातात. काही भागात थापून करतात तर काही ठिकाणी लाटून केले जातात. माझे बालपण सोलापूर भागातले, तिथे हे धपाटे अगदी हमखास केले जातात. कर्नाटक पासून झालाच असल्यामुळे अगदी पातळ असे धपाटे, भाकरीप्रमाणे थापून केले जातात. त्यासाठी खास तगडं-पातळ पत्रा मिळतो, त्याचा वापर केला जातो. प्रवासाला निघालो कि आजी अगदी आठवणीने धपाटे आणि शेंगाची चटणी करून घेणार. तसेच वेळामावश्याला धपाटे-मुगाची उसळ-ज्वारीचे आंबील असा बेत असायचा.
२ प्रकारे हे दांपत्ये कसे करायचे ते सांगणार आहे.
थापून करायच्या धपाट्यांसाठी साहित्य -
२ वाटी ज्वारीचे पीठ
१ वाटी बेसनपीठ
१ मोठा चमचा गव्हाचे पीठ
तीळ
१ छोटा चमचा ओवा
१ मोठा चमचा धणे
१ मोठा चमचा जिरे
कोथिंबीर
४-५ पाकळ्या लसूण
५-६ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा हळद
पाव चमचा हिंग
मीठ
कृती-
१. सर्व पीठं एकत्र करून त्यात, हळद,हिंग, मीठ घालावे.
२. ओवा-जिरे-धणे-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबीर यांची पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.
३. हि पेस्ट पीठामध्ये घालावी.
४. भाकरी प्रमाणे उकळते पाणी घालून पीठं भिजवावे.
५. पिठाच्या गोळ्याला तीळ लावून घ्यावेत. ज्वारीचे पीठं पसरून त्यावर भाकरी प्रमाणे थापून, धपाटे करावेत.
६. भाजताना,भाकरीप्रमाणे प्रथम पाणी लावून घ्यावे. पाणी सुकल्यावर तेल लावून भाजावे.
लाटून करायच्या धपाट्यांसाठी
२ वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी बेसनपीठ
१ चमचा ज्वारीचे पीठ
१ चमचा लाल तिखट
कोथिंबीर
तीळ
१ छोटा चमचा ओवा
१ मोठा चमचा धणे
१ मोठा चमचा जिरे
४-५ पाकळ्या लसूण
१/२ चमचा हळद
पाव चमचा हिंग
मीठ
कृती -
१. सर्व पीठं एकरतर करून घ्यावीत.मीठ,हळद,हिंग,लाल तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मिरची ऐवजी लाल तिखट वापरले आहे.
२. ओवा,जिरे, धणे,लसूण पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
३. ती पेस्ट पिठात घालावी.
४. पराठ्यांप्रमाणे पीठं मळून घ्यावे.
५. तेल किंवा गव्हाचे पीठ लावून धपाटे लाटावेत.
६. तेल लावून भाजून घ्यावेत.
कोणतीही कोरडी चटणी, लोणचं किंवा मुगाच्या उसळी सोबत धपाटे खूप छान लागतात
Recipe Video-
👌
ReplyDelete